Home ताज्या बातम्या ५० वर्ष जुना दादरचा मच्छीमार्केट हटविण्याचा बीएमसीचा डाव; कोळीबांधव संतप्त, आंदोलनाचा इशारा

५० वर्ष जुना दादरचा मच्छीमार्केट हटविण्याचा बीएमसीचा डाव; कोळीबांधव संतप्त, आंदोलनाचा इशारा

173
0
५० वर्ष जुना दादरचा मच्छीमार्केट हटविण्याचा बीएमसीचा डाव; कोळीबांधव संतप्त, आंदोलनाचा इशारा

मुंबईचे आद्य रहिवासी कोळी बांधवांचे गेली ५० वर्ष पेक्षाही अधिक काळ जेथे आपला मासे विकण्याचा व्यवसाय करतात तेथून हटविण्याचा मुंबई महानगरपालिकेचा डाव असून त्याविरोधात मच्छिमार बांधव आक्रमक झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल विरार येथे कार्यकर्ता मेळावासाठी आले असता या मच्छिमार बांधवांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भेट होऊ शकली नाही. शिंदे यांनी या बांधवांना आहे तेथेच त्यांचे पुनर्वसन करू असे आश्वासन दिले होते, ते आश्वासन पाळले गेले नाही व मा. उच्च न्यायालयाने येथील जागेवर बीएमसीला स्टे ऑर्डर दिले असताना देखील सदरच्या जागेवर लोखंडी फ्रेम लावून त्यावर आता पत्रे लावून ती जागा आमच्यासाठी बंद केली जाणार असल्याचे येथील मासे विक्रेत्यांनी सांगितले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या विषयावर जातीने लक्ष घालून त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देत हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती केली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

दादर पश्चिमेकडील सेनापती बापट मार्गावर असलेल्या या पारंपरिक मासळी बाजार हटवण्याच्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (बीएमसी) कथित योजनेविरोधात कोळी बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा बाजार सुमारे ५० वर्षांपासून कोळी समाजाच्या महिलांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. बीएमसीने हा बाजार कायमस्वरूपी हटवून विक्रेत्यांना वडाळा किंवा ऐरोली टोलनाक्याजवळील पर्यायी जागी हलवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे.

दादरमधील हा बाजार हटवल्यास येथील कोळी कुटुंबांची उपजीविका धोक्यात येईल. “हा बाजार आमच्या परंपरेचा भाग आहे. बीएमसीला ट्रॅफिक आणि अस्वच्छतेचे कारण पुढे करून आम्हाला उघड्यावर सोडायचे आहे. श्रीमंत टॉवर्समधील रहिवाशांना माशांचा वास सहन होत नाही म्हणून हा डाव आहे,” असे कांचन टपोरी या मासे विक्रेता महिलेने सांगितले. यापूर्वी २०२१ मध्ये बीएमसीने या बाजारातील काही भाग पाडले होते, ज्यामुळे कोळी समाजात मोठा रोष निर्माण झाला होता.

कोळी समाजाच्या नेत्या आणि संघटनांनी बीएमसी आयुक्तांना निवेदन सादर करून बाजार कायम ठेवण्याची किंवा योग्य पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. जर बीएमसीने हा बाजार हटवला तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. बीएमसीकडून मात्र याबाबत अधिकृत निवेदन आलेले नाही.