ठाणे जिल्ह्यातील पारोळ-शिरसाड-अंबाडी मार्गावर शनिवारी संध्याकाळी खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात घडला. यात नालासोपारा येथील ७ वर्षीय हर्ष समीर थोरी या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!ठाणे शहरात शुक्रवार रात्रीपासून अवजड वाहनांना प्रवेशबंदी असल्याने पारोळ-भिवंडी मार्ग हा पर्यायी मार्ग म्हणून वापरला जात आहे. या अरुंद रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढल्याने रस्त्याची दुरवस्था आणि सततची वाहतूक कोंडी ही नेहमीची बाब बनली आहे.
शनिवारी संध्याकाळी आचोळे तलाव (नालासोपारा) येथे राहणारे समीर थोरी हे पत्नी, सात वर्षीय मुलगा हर्ष आणि मुलीसह दुचाकीवरून वज्रेश्वरीला देवदर्शनासाठी जात होते. उसगाव येथे वाहतूक कोंडीत दुचाकीचे चाक खड्ड्यात अडकल्याने वाहन रस्त्यावर कोसळले. यात समीर थोरी, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले रस्त्यावर फेकले गेले.
दुर्दैवाने हर्ष रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत असतानाच मागून येणाऱ्या अवजड वाहनाचे चाक त्याच्या अंगावरून गेले, ज्यामुळे त्याचा तत्काळ मृत्यू झाला. समीर थोरी, त्यांची पत्नी आणि मुलगी किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघाती वाहन आणि चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी सांगितले.









