प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून अश्लील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराने १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला ब्लॅकमेल करून पैसे उकळले. या त्रासाला तोंड देऊ शकत नसल्याने तिने सोमवारी विरार येथील राहत्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. विरार पोलिसांनी या प्रकरणी आरोपी प्रियकर अमित प्रजापतीला अटक केली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!पीडित तरुणी विरार पूर्वेकडील नाना नानी पार्कजवळील अपार्टमेंटमध्ये कुटुंबासोबत राहत होती. ती स्थानिक महाविद्यालयात शिकत असताना २१ वर्षीय अमित प्रजापती याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, संबंध तोडण्याच्या निर्णयानंतर अमितने तिला सतत त्रास देण्यास सुरुवात केली. अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्याकडून १५ हजार रुपये उकळले, असा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.
तरुणी सतत चिंताग्रस्त दिसत असल्याने कुटुंबीयांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर वडील सोमवारी सकाळी महाविद्यालयात गेले आणि प्राचार्यांकडे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्राचार्यांनी अमितवर कारवाई करण्याऐवजी उलट पीडितेचीच त्याची माफी मागायला लावली, असा गंभीर आरोप आहे. याशिवाय, अमितने आपल्या साथीदारांच्या मदतीने पीडितेच्या वडिलांना मारहाणही केली.
दुपारी दीड वाजता घरी परत आलेल्या तरुणीने हा सर्व त्रास सहन न झाल्याने चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. तिला प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर बोरिवलीच्या कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात हलविण्यात आली. मात्र, मध्यरात्री दीड वाजता तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी अमित प्रजापतीला अटक करून त्याच्यावर ब्लॅकमेल, छळ आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण महाविद्यालय प्रशासनाच्या दुर्लक्षित वर्तनामुळे आणखी गंभीर बनले असून, पुढील तपास सुरू आहे.









