Home वसई - विरार शिवरायांच्या वेशात तरुणाला हिंदी रक्षकाने हटकलं: ‘हिंदीत बोल’चा माज, युवकाने चांगलंच झापलं!

शिवरायांच्या वेशात तरुणाला हिंदी रक्षकाने हटकलं: ‘हिंदीत बोल’चा माज, युवकाने चांगलंच झापलं!

246
0

ऐतिहासिक वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारंपरिक वेशभूषेत फोटोशूट करत असलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकाने रोखल्याची घटना समोर आली आहे. हा वादग्रस्त प्रसंग मोबाईल कॅमेर्यात कैद झालेल्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

लक्ष्मीपूजनेच्या (२२ ऑक्टोबर) दिवशी ‘किल्ले वसई मोहीम परिवार’ आणि ‘अनाम प्रेम महाराष्ट्र’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वसई किल्ल्यावर दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो दिवे प्रज्वलित करून ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेक तरुणांनी शिवकालीन पोशाख (पगडी, अंगरखा, तलवार) परिधान करून उत्साहाने सहभाग घेतला.

या वेळी एका युवकाने शिवरायांच्या वेशात किल्ल्याच्या एका भागात छोटे दृश्य चित्रीकरण किंवा फोटोशूट सुरू केले. मात्र, तात्काळ सुरक्षा रक्षकाने (बृजेश कुमार गुप्ता) त्याला थांबवले आणि चित्रीकरणास मज्जाव केला. रक्षकाने म्हटले, “हिंदीत बोल, मला मराठी येत नाही!” तसेच, किल्ल्यावर फोटोशूटसाठी परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले.

तरुणाने रक्षकाला चांगलेच फैलावर घेतले. त्याने स्पष्ट शब्दांत म्हटले: “मराठी येत नाही का तुला? मराठी आलीच पाहिजे! किल्ल्यासारख्या पवित्र ठिकाणी प्री-वेडिंग शूट, डान्स व्हिडिओ आणि उच्छादमस्ती करणाऱ्यांकडे दुर्लक्ष का? पण शिवरायांच्या वेशात चित्रीकरण केलं की अडवता? महाराजांच्या गडावर अशी मनाई खपवून घेणार नाही!”

हा संवाद व्हिडिओत पूर्णपणे कैद झाला असून, तो लाखो लोकांनी पाहिला आहे.

दुर्गप्रेमी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, रक्षकावर कारवाईची मागणी केली आहे. येथे वारंवार प्री-वेडिंग शूट्स आणि व्यावसायिक चित्रीकरण होत असताना, शिवरायांच्या वेशातील साधे फोटोशूट रोखले जाणे हा मुद्दा संवेदनशील ठरला आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण ही घटना मराठी भाषा आणि सांस्कृतिक अभिमानाच्या मुद्द्यावर राज्यव्यापी वाद उफाळून आणण्याची शक्यता आहे.