नायगाव पूर्वेतील रश्मी फेज येथील महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये १५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाहून आत प्रवेश केला. गॅस-कटरच्या साहाय्याने तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करताच दुकानातील आपत्कालीन सायरन जोरात वाजू लागला. सायरनच्या आवाजाने घाबरलेले चोरटे लाखो रुपयांचा मुद्देमाल सोडून घटनास्थळावरून पळ काढून गेले.
दुकानमालकाला तात्काळ अलर्ट मिळाल्याने त्यांनी फोन करून पोलिसांना कळवले. नायगाव पोलिसांनी त्वरित तपास सुरू करताना घटनास्थळावरील पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारे ४८ तासांच्या आत तिघांना रंगेहाथ पकडले. यातील विजय बन्सराज यादव (वय २५), अमोल देवसीचाई गोहील (वय ३२) याच्यावर बोरिवली पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत तर तिसरा आरोपीचे नाव सचिन मेघराज सिंग (वय ३३) असे आहे.
ही यशस्वी कारवाई नायगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय कदम, सहायक पोलीस निरीक्षक गणेश केकान, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहीते, चेतन ठाकरे, सचिन खंताळ, जयवंत खंडची, अशोक पाटील, अमोल बरडे यांच्या पथकाने केली.
सायरनने वाचवले लाखो रुपये
“दुकानात सायरन यंत्रणा नसती तर आज मोठी चोरी झाली असती. दुकानात कोट्यवधींचे दागिने होते,” असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले.
वसई-विरार परिसरात सराफा दुकानांवर चोरी-लुटांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्व सराफा दुकानदारांनी भिंत व तिजोरीला जोडलेले जोरदार सायरन, सीसीटीव्ही कॅमेरे, रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक अशी तिहेरी सुरक्षा यंत्रणा बसवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.








