Home गुन्हे जगत दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये स्फोट: ११ ठार, ३० हून अधिक...

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये स्फोट: ११ ठार, ३० हून अधिक जखमी; देशभर हाय अलर्ट

68
0
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये स्फोट: ११ ठार, ३० हून अधिक जखमी; देशभर हाय अलर्ट

देशाची राजधानी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. या घटनेत आतापर्यंत ११ जण ठार झाले असून, ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटानंतर आजूबाजूच्या सहा हून अधिक वाहनांना आग लागली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी अग्निशमन दलांना घटनेची माहिती मिळाली आणि तात्काळ पथके घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक माहितीनुसार, स्फोट इको व्हॅनसारख्या वाहनात झाल्याचा संशय आहे. सुरुवातीला काहींना सिलेंडर स्फोट वाटले, मात्र नंतर घटनेचे गांभीर स्वरूप समोर आले. दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितले की, सायंकाळी ६.५२ मिनिटांनी एक धिम्या गतीची कार रेड लाईटवर थांबली आणि त्यात स्फोट झाला. “हा सामान्य स्फोट नाही, बारकाईने तपास सुरू आहे,” असे त्यांनी नमूद केले. घटनास्थळी एनडीआरएफ, एनएसजी, फॉरेन्सिक टीम, दहशतवादविरोधी पथक आणि सायबर सेल दाखल झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली.

स्फोटस्थळ लाल किल्ल्यापासून अवघे ८०० मीटर अंतरावर असल्याने संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

फरीदाबादमध्ये ३००० किलो स्फोटके जप्त
त्याचवेळी, फरीदाबादमध्ये एका काश्मिरी व्यक्तीच्या भाड्याच्या घरात ३६० किलो स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आली. फरीदाबाद आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ८ जणांना अटक करण्यात आली. गेल्या चार दिवसांत (७ ते १० नोव्हेंबर) दिल्लीत काही दहशतवाद्यांना पकडल्याने या स्फोटाकडे सुरक्षा यंत्रणांचे विशेष लक्ष आहे.

देशभर हाय अलर्ट
या घटनेनंतर दिल्लीसह मुंबई, लखनौ आणि इतर प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत सर्व पोलीस ठाण्यांना नाकाबंदी, झाडझडती, ग्राउंड इंटेलिजन्स नेटवर्क सक्रिय करणे आणि संवेदनशील भागात गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी दिल्ली पोलिस आयुक्त आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. “सर्व अधिकारी घटनास्थळी आहेत आणि सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. लवकरच सर्व माहिती जनतेसमोर ठेवू,” असे शहा म्हणाले. ते जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयातही गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तातडीने प्रतिक्रिया देत मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. “सायंकाळी झालेल्या या स्फोटात जवळचे गमावलेल्यांसाठी मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना. मी गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आहे,” असे मोदी म्हणाले.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेची बातमी ‘अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक’ म्हटली आहे. “या दुर्दैवी घटनेत निरपराध लोकांचा मृत्यू दु:खद आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत मी उभा आहे आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो,” असे गांधी म्हणाले.

या घटनेनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. काही नेत्यांनी पाकिस्तानचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली असून, केंद्र सरकारने पूर्ण तपासाचे आदेश दिले आहेत.