शास्ती रद्द, ५ ० कोटी विकास निधी आणि कला – क्रीडा महोत्सवासाठी २ कोटी अनुदान
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती सरसकट रद्द करण्याची, शहर विकासासाठी ५० कोटी विशेष निधी आणि ३६व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवासाठी २ कोटी अनुदानाची मागणी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. मंत्रालयातील बैठकीत हे शिष्टमंडळ उपस्थित होते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!शास्ती रद्द करण्याची मागणी : वसई-विरारमध्ये १० लाखांहून अधिक मालमत्ता असून, त्यापैकी ६६ हजारांवर शास्ती आकारली आहे. यात औद्योगिक गाळे, चाळी आणि स्वतःच्या घरांचा समावेश आहे. शास्ती मूळ करापेक्षा जास्त असल्याने कर भरण्याकडे नागरिक उदासीन आहेत. पिंपरी-चिंचवड आणि ठाणे महापालिकेप्रमाणे येथेही शास्ती माफ करावी, अशी विनंती ठाकूर यांनी केली.
विकास निधीची गरज : शहराची लोकसंख्या २५ लाखांवर पोहोचली असून, मूलभूत सुविधांसाठी मनपाला अडचणी येत आहेत. त्यामुळे ५० कोटींचा विशेष निधी देण्याची मागणी करण्यात आली.
कला-क्रीडा महोत्सवासाठी अनुदान : ३६व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवात गेल्या वर्षी ६५ हजार स्पर्धक सहभागी झाले, यातून अनेक कलाकार-क्रीडापटू राज्य – राष्ट्रीय स्तरावर झळकले. यासाठी २ कोटी अनुदानाची विनंती ठाकूर यांनी केली.
उपमुख्यमंत्री पवार यांनी तिन्ही मागण्यांवर विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. बैठकीला माजी महापौर नारायण मानकर, अशोक कुलास, अशोक ग्रोवर आणि महोत्सवाचे प्रकाश वनमाळी उपस्थित होते.









