बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्रातही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. विशेषतः वसई-विरार शहरात शुक्रवारी बिहार निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार जल्लोष साजरा केला. फटाके फोडणे, मिठाई वाटप आणि “बिहार तो झाकी है, वसई-विरार अभी बाकी है” अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.
बिहारमध्ये भाजपप्रणित एनडीएने २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली, तर महाआघाडीला अवघ्या ३० जागांवर समाधान मानावे लागले. या यशामुळे वसई-विरारमधील भाजप नेते आणि कार्यकर्ते उत्साहित झाले असून, येऊ घातलेल्या वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी मोर्चेबांधणी तीव्र केली आहे.
शुक्रवारी विरार येथे प्रथमच आयोजित पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात हा उत्साह शिगेला पोहोचला. यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी सांगितले,
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये भाजपने तिप्पट मतांसह २०० हून अधिक जागा मिळवल्या. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही असेच चित्र राहील.”
जनता दरबाराला भाजप नेते गणेश नाईक, नालासोपारा आमदार राजन नाईक, वसई आमदार स्नेहा दुबे पंडित, जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील आणि अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
महायुती एकत्र लढणार – नाईक
गणेश नाईक यांनी स्पष्ट केले की, पालघर जिल्ह्यातील नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र येऊन महायुती म्हणून लढणार आहेत.
बिहारच्या विजयाने वसई-विरारमध्ये भाजपला नवीन ऊर्जा मिळाली असून, महापालिका निवडणुकीच्या रणांगणात आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे.








