Home तक्रार - समस्या शिक्षक नाही तर शाळाच बंद ! कामण जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ठोकले...

शिक्षक नाही तर शाळाच बंद ! कामण जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ठोकले टाळे

107
0
शिक्षक नाही तर शाळाच बंद ! कामण जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ठोकले टाळे

वसई तालुक्यातील आदिवासीबहुल कामण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत गंभीर शिक्षकटंचाईमुळे अखेर पालकांनी सोमवारी (१७ नोव्हेंबर २०२५) संताप अनावर होऊन शाळेला टाळे ठोकले. शाळा पूर्णपणे बंद पाहून पालक-ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या शाळेत एकूण १,०४६ विद्यार्थी शिकत आहेत, नियमानुसार या शाळेला १९ शिक्षक असणे आवश्यक, पण प्रत्यक्षात फक्त ९ शिक्षक कार्यरत. इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या पाच वर्गांना एकही शिक्षक नाही.

यापूर्वी पालक आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे, रजनीकांत म्हात्रे यांनी शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या. विरार येथील पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारातही हा मुद्दा उपस्थित झाला होता. “बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू,” अशी ग्वाही खुद्द पालकमंत्र्यांनी दिली होती. मात्र त्याबाबत काहीच हालचाल न झाल्याने पालकांचा संयम सुटला.

सकाळी शेकडो पालक-ग्रामस्थांनी शाळेसमोर मोर्चा काढला. घोषणाबाजी केल्यानंतर त्यांनी शाळेच्या मुख्य गेटला टाळे ठोकले आणि पूर्ण शाळा बंद पाडली. “आम्ही वर्षानुवर्षे पाठपुरावा करतोय, पण कोणीही दखल घेत नाही. म्हणून नाईलाजास्तव हे पाऊल उचलले,” असे सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी सांगितले.

पालकांच्या आंदोलनाची दखल घेत वसई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी छत्तरसिंग राजपूत यांनी तात्काळ ग्रामस्थांशी फोनवर चर्चा केली. “तातडीने ५ नवीन शिक्षक कामण जिल्हा परिषद शाळेत पाठवले जातील. याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत,” असे लेखी आश्वासन दिल्यानंतर पालकांनी दुपारी टाळे उघडले आणि शाळा सुरु झाली.
जर एक आठवड्‌यात शिक्षक प्रत्यक्ष रुजू झाले नाहीत, तर पुन्हा कायमस्वरूपी टाळे ठोकू. असा इशारा पालकांनी दिला आहे.