नालासोपारा पश्चिम येथील नाळे गावातील बेणापट्टी भागात धक्कादायक घटना घडली. १७ वर्षीय मुलगी आणि २० वर्षीय तरुणाने प्रेमसंबंधांमुळे विष प्राशन करून आत्महत्या केली. दोघांच्या कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पोलिस तपास सुरू आहे.
बुधवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी साडेसात वाजता मुलीच्या घरी तिच्या खोलीत गेल्यावर घरच्यांना भयावह दृश्य दिसले. दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडले असून, तोंडातून फेस येत होता. तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मुलगी नाळा बेणापट्टी गावची रहिवासी होती, तर तरुण अर्नाळा येथील सहजीवन परिसरातील होता. दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध असल्याचे समजते. नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. प्राथमिक तपासात विष प्राशनाची पुष्टी झाली असली, तरी मृत्यूचे नेमके कारण आणि इतर तपशील तपासादरम्यान उघड होणार आहेत.








