Home ताज्या बातम्या वसईतील उठाबशा शिक्षेमुळे विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेची मान्यता रद्द

वसईतील उठाबशा शिक्षेमुळे विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेची मान्यता रद्द

178
0
वसईतील उठाबशा शिक्षेमुळे विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेची मान्यता रद्द

वसई पूर्वेतील सातिवली येथील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत उशिरा आल्याने उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे सहावीतील १३ वर्षीय विद्यार्थिनी काजल गौंड हिचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात शाळा व्यवस्थापनाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेच्या सखोल चौकशीनंतर हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या दोन्ही शाखांची मान्यता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अखेर रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने १३ डिसेंबर २०२५ रोजी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या घटनेनंतर सर्व स्तरांतून शाळेविरोधात तीव्र संताप व्यक्त झाला होता. पालघर जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात आली. ४ डिसेंबर रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांकडे सुनावणी घेण्यात आली. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम २०१२ च्या कलम १४(१)(ख) आणि (क) नुसार विद्यार्थी हिताला बाधा पोहोचवणे व शासन नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संचालक डॉ. महेश पालकर यांनी मान्यता रद्द करण्याची शिफारस केली होती.

शासनाच्या कार्यासन अधिकारी प्रमोद कदम यांनी जारी केलेल्या परिपत्रकात श्रीमती मनरादेवी एज्युकेशन संस्था संचालित श्री हनुमंत विद्यामंदिर (इंग्रजी व हिंदी माध्यम) शाळांची मान्यता २०२५-२६ अखेर रद्द करण्यात येत असल्याचे नमूद आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मान्यता रद्द करण्याची मुख्य कारणे:

  • शारीरिक व मानसिक शिक्षा देण्यास बंदी असतानाही शिक्षिकेकडून शारीरिक शिक्षा देण्यात आली.
  • शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचे निकष पूर्ण न होणे.
  • विद्यार्थी सुरक्षेसाठी भौतिक सुविधा व उपाययोजनांचा अभाव.
  • बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम-२००९ नुसार “नमुना-२” प्रमाणपत्र न घेणे.
  • शाळा इमारतीला बांधकाम परवानगी नसणे.
  • इयत्ता ९वी व १०वीचे वर्ग अनधिकृतपणे चालवणे.
  • सखी-सावित्री समिती व माता-पालक संघ यांसारख्या आवश्यक समित्या स्थापन न करणे.

याशिवाय, शाळेकडे दुर्लक्ष केल्याबाबत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी प्रभारी गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख या तीन अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावर निलंबित केले आहे.