वसई पूर्वेतील वालीव-सातिवली येथील रिलायबल ग्लोरी या संकुलात सोमवारी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी दीड वाजता तीन मास्कधारी दरोडेखोरांनी धाडसी दरोडा घातला. तिसऱ्या मजल्यावरील ३०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये एकट्या असलेल्या राऊत कुटुंबावर हल्ला करून त्यांनी १० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी तीन मास्कधारी दरोडेखोरांनी राऊत यांच्या घराचा दरवाजा ठोठावला, त्यावेळी घरात असलेल्या १५ वर्षीय मुलाने दार उघडताच तिघांनी त्याला धक्का देत घरात प्रवेश केला. मुलाला चाकूचा धाक दाखवून हात-पाय बांधले. त्यानंतर स्वयंपाकघरात असलेल्या आई संगीता राऊत (वय ४०) यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांनाही बांधून ठेवले. त्यांच्याकडून जबरदस्तीने कपाटाची चावी घेऊन दागिने व रोख रक्कम लंपास केली.
या झटापटीत संगीता राऊत या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या आठवडाभरात वसई-विरार परिसरात दरोडा व घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांची कारवाई
वालीव पोलिसांनी दरोडा व मारहाणचा गुन्हा दाखल केला आहे. परिमंडळ-२ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी सांगितले की, “आम्ही चार खास पथके तयार केली आहेत. गुन्हे शाखेचे पथकही समांतर तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची चौकशी आणि तांत्रिक तपास सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करू,” असा विश्वास त्यांनी दिला.
वसई-विरारमध्ये चोरी-दरोड्यांचा धडका
काही दिवसांपूर्वी नायगाव पूर्वेतील सनटेक वर्ल्ड इमारतीतून ६ लाखांचा ऐवज चोरीला गेला, नायगाव येथील सराफा दुकानात भिंत फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता आणि आता हा भर दुपारीचा दरोडा घालण्यात आला. या साखळीमुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून पोलिसांवर गस्तीचा दबाव वाढला आहे.









