मागील १५ वर्षांत जीवदानी रोडवर एकदाही संपूर्ण, दर्जेदार रस्त्याचे काम झालेले नाही. फक्त खड्डे बुजवण्याचे पॅचवर्क केले जाते, तेही काही दिवसांत उखडते. या तात्पुरत्या डागडुजीमुळे अपघात, वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,” अशी खंत सामाजिक कार्यकर्ते मनाफ बलोच यांनी वसई विरार शहर महानगरपालिका एक पत्र देऊन व्यक्त केली आहे. तसेच जीवदानी रोडवरील संपूर्ण रस्त्यांचे काम करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या वतीने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “रस्ता खराब झाला की पॅचवर्क, पुन्हा खराब झाला की पुन्हा पॅचवर्क… हाच सततचा खेळ सुरू आहे. यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहेत, रुग्णवाहिकांना वेळेवर पोहोचता येत नाही, पावसाळयात रस्ता पूर्णपणे चिखलमय होतो आणि धूर-धूळ तर नेहमीचाच त्रास आहे. आमचा संयम आता संपत चालला आहे.”
“पॅचवर्क नव्हे, कायमस्वरूपी रस्ता हवा”
नागरिकांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली आहे की, “आता पॅचवर्कने नागरिकांची फसवणूक थांबवा. जीवदानी रोडचे संपूर्ण रस्त्याचे काम तातडीने, दर्जेदार सिमेंट काँक्रिट किंवा डांबरीकरणाने करावे. हा रस्ता केवळ स्थानिक रहिवाशांसाठीच नव्हे, तर जीवदानी मंदिराकडे येणाऱ्या हजारो भाविकांसाठीही महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात. मंदिराच्या नवरात्रौत्सवानिमित्त तर येथे प्रचंड गर्दी असते. असे असतानाही गेल्या दीड दशकात एकदाही पूर्ण रस्ता न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.
नागरिकांनी शेवटची विनंती करताना लिहिले आहे, “आम्हाला आश्वासन नको, कृती हवी. महापालिका आयुक्त आणि संबंधित अभियंता यांनी तातडीने या प्रश्नांची दखल घेऊन जीवदानी रोडचे संपूर्ण काम सुरू करावे. अन्यया आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.”








