पालखी सोहळ्यानंतर भाविकांची गर्दी
वसईतील ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या निर्मळ यात्रोत्सवाला शनिवारपासून (१५ नोव्हेंबर २०२५) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. श्रीमद् जगदगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या समाधीस्थळी भरणारा हा यात्रोत्सव यंदा १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत चालणार आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!पालखी सोहळ्याने झाली उत्सवाची सुरुवात
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडी पालखी सोहळ्याने यात्रेला प्रारंभ झाला. रविवारी मध्यरात्री १२.४० वाजता शंकराचार्य मंदिरातून शंकराचार्यांच्या चरणपादुकांची पालखी निघाली. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शेकडो गावकरी, ढोल-ताशांच्या गजराल व भजनाच्या सूरात निर्मळ तलावाला प्रदक्षिणा घालत होते. पहाटे अजित भिडे यांच्या भिडे वाड्यात पादुकांचे विशेष पूजन झाले. सकाळी साडेसहा वाजता पालखी पुन्हा मंदिरात दाखल झाली. दीपमाळ, तुळशी वृंदावन आणि प्राचीन शिलालेखांना आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले होते.
भाविकांसाठी खास सुविधा
बस : वसई-विरार महापालिका बस क्र. ११९, १२०, १३० किंवा ३०६ (निर्मळ गाव बसस्टॉप)
पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ शौचालये, विश्रांती कक्ष
संपूर्ण परिसरात वसई पोलिसांचा कडक बंदोबस्त
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संध्याकाळी निर्मळ-भुईगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद
यात्रेची रेलचेल आणि आकर्षणे निर्मळ नाका ते भुईगाव फाटा या रस्त्यावर दोन्ही बाजूला ३०० पेक्षा जास्त दुकाने थाटली आहेत. प्रसिद्ध वसईची सुकेळी, मिठाया, खेळणी, कपडे, सुकामेवा यांची रांग लागली आहे. लहान मुलांसाठी आकाश पाळणा, टोरोटोरो, चक्री पाळणा, ब्रेकडान्स अशी करमणुकीची साधनेही दाखल झाली आहेत.
गुजरातहूनही भाविकांची हजेरी
“महाराष्ट्रासह गुजरातमधूनही मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. यात्रेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय,” असे मंदिर विश्वस्त मंडळाचे सचिव पंकज चोरघे यांनी सांगितले.
निर्मळला कसे पोहोचावे ?
- रेल्वे : मुंबई-ठाण्याहून लोकलने नालासोपारा स्टेशन
- तिथून : थेट ऑटो रिक्षा (१०-१५ मिनिटे)
- बस : वसई-विरार महापालिका बस क्र. ११९, १२०, १३० किंवा ३०६ (निर्मळ गाव बसस्टॉप)









