Home गुन्हे जगत विरारमध्ये पाण्यावरून शेजाऱ्याचा खूनरागाच्या भरात महिलेचा डास मारण्याच्या स्प्रेने हल्ला, ५३ वर्षीय...

विरारमध्ये पाण्यावरून शेजाऱ्याचा खूनरागाच्या भरात महिलेचा डास मारण्याच्या स्प्रेने हल्ला, ५३ वर्षीय उमेश पवार ठार

121
0
विरारमध्ये पाण्यावरून शेजाऱ्याचा खूनरागाच्या भरात महिलेचा डास मारण्याच्या स्प्रेने हल्ला, ५३ वर्षीय उमेश पवार ठार

विरार पश्चिमेतील जेपी नगर परिसरात पाणी भरण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने मंगळवार १८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री जीवघेणे रूप धारण केले. या भयंकर घटनेत ४७ वर्षीय महिलेने शेजाऱ्यावर डास मारण्याचा स्प्रे थेट तोंडावर फवारल्याने ५३ वर्षीय उमेश पवार यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

याबाबात सविस्तर माहिती अशी की, जेपी नगर येथील १५ क्रमांकाच्या इमारतीत उमेश पवार (वय ५३) आणि कुंदा तुपेकर (वय ४७) ही दोन्ही कुटुंबे राहतात. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी भरण्याच्या वेळेचा आणि रांगेतील जागेचा वाद या दोन्ही कुटुंबांमध्ये सुरू होता. मंगळवारी रात्री पुन्हा पाणी भरण्यावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

वाद विकोपाला गेल्यावर संतापलेल्या कुंदा तुपेकर यांनी घरातून डास मारण्याचा स्प्रे आणला आणि तो थेट उमेश पवार यांच्या तोंडावर फवारला. स्प्रेमधील तीव्र रसायनांच्या वासामुळे उमेश पवार यांना श्वास घेणे अवघड झाले आणि ते जागीच बेशुद्ध पडले. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कुंदा तुपेकर हिला ताब्यात घेऊन अटक केली.
“आम्ही भा.द.वि. कलम १०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.

वसई-विरार शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांना रोज पाण्यासाठी प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये नळाला अत्यल्प दाबाने किंवा फक्त काही मिनिटांसाठी पाणी येते. त्यामुळे टँकर किंवा सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी सकाळपासूनच प्रचंड गर्दी आणि रांगा लागतात.

रांगेतील क्रम, जास्त भांडी भरणे, पाण्याची वेळ यावरून रोज छोटे-मोठे वाद होतात. हे वाद कधी कधी इतके टोकाला जातात की मारामाऱ्या आणि आता तर जीवघेण्या हल्ल्यांपर्यंत मजल मारत आहेत. जेपी नगर परिसरातील ही घटना त्याच पाणीटंचाईच्या राक्षसी रूपाचे विदारक उदाहरण आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जेपी नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.