होम ताज्या बातम्या आणखी किती जीव गेल्यावर महापालिका जागी होणार…?

आणखी किती जीव गेल्यावर महापालिका जागी होणार…?

441
0
आणखी किती जीव गेल्यावर महापालिका जागी होणार…?

म्हाडा परिसरातील खुल्या गटार-नाल्यामध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, नागरिकांचा प्रशासनावर आरोप

विरार पश्चिमेकडील म्हाडा परिसरात खुल्या मोठ्या गटारनाल्यात काही दिवसापूर्वी एका इसमाचा मृतदेह सापडला त्यामुळे विभागात प्रचंड खळबळ माजली, या अगोदरही या गटाराच्या पुढच्या बाजुला एक मृतदेह सापडला होता एका वर्षाच्या आत दोन व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक करण चौधरी यांनी वसई-विरार महानगरपालिका आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांना एक तातडीचे पत्र लिहून खुल्या गटारनाल्यावर तात्काळ सुरक्षा उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी म्हाडा इमारत क्र. ११ जवळील खुल्या गटार-नाल्यात आकाश पगारे नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला. आकाश हा १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता, त्याच्या कुटुंबीयांनी तो हरवला असल्याची तक्रार बोळींज पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र सकाळच्या सुमारास नागरिकांना गटाराच्या पाण्यावर मृतदेह दिसला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याची ओळख पटवून त्याचा मुतदेह त्याच्या परिवाराकडे स्वाधीन करण्यात आला.

काही महिन्यांपूर्वीदेखील अग्निशमन केंद्रासमोर (म्हाडा परिसर) याच नाल्यात दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. हा खुला गटार-नाला मेफेअर सोसायटीजवळील पुलापासून सुरू होऊन वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयापर्यंत जातो. पूर्णपणे झाकलेला नसल्याने यात कोणी पडले तर बाहेर येणे अशक्य असते, ज्यामुळे मृत्यू ओढवतो, असे दोन्ही दुर्घटनेतून सिद्ध झाले आहे. तसेच या गटार-नाला मध्ये कुत्रे-मांजर सारखे प्राणी पडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडत असतात.

  • स्वच्छतेसाठी सोयीस्कर मेनहोल किंवा द्वारे असावीत
  • सुरक्षेच्या दृष्टीने मजबुती असावे
  • या उपाययोजनांमुळे परिसर स्वच्छ आणि सुंदरही दिसेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
  • शहरभर तपासणीची मागणी

विरार-वसई परिसरातील सर्व खुली नाले, गटारे आणि सांडपाण्याचे मार्ग तपासून त्याठिकाणीही अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था उभी करावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे. यामुळे मनुष्याबरोबरच प्राण्यांचेही जीव वाचतील.

सदर निवेदन वसई-विरार महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, उपसंचालक नगररचना मनिष भिस्नुरकर, मुख्य अभियंता, माजी आमदार क्षितिज ठाकूर, बहुजन विकास आघाडी पुरस्कृत युवा विकास आघाडीचे अध्यक्ष सिद्धार्थ ठाकूर, माजी सभापती (प्रभाग अ) सखाराम महाडिक यांना दिले आहे.

यावेळी येथील जनतेचा हक्काचा माणूस करण चौधरी, प्रदिप पवार, रोहित सोलंकी, सचिन देसाई, गिता पटेल, राजन मोरे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र म्हसकर, इस्माईल पठाण, दिपक चौधरी, गौरव सावंत, निलेश आगटे, संतोष सरगडे आदी उपस्थित होते.