विरार पश्चिम रेल्वे स्थानक ते म्हाडा वसाहत या मार्गावर बस फेऱ्या अतिशय कमी असून रात्री उशिरापर्यंत बस सेवा उपलब्ध नसल्याने स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत स्थानिक रहिवासी आणि ग्राहक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गितेंद्र कमलाकर मिर्लेकर यांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन विभागप्रमुख, महापौर आणि विरोधी पक्ष नेत्यांना पत्र पाठवून बस फेऱ्या वाढवून हि सेवा रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मागणी केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, सध्याच्या वेळापत्रकानुसार विरार पश्चिम रेल्वे स्थानक ते म्हाडा वसाहत या मार्गावर सकाळी ९.०० वाजता पहिली बस आणि रात्री ९.४९ वाजता शेवटची बस धावते. महानगरपालिकेच्या दिवसभरात फक्त ६ फेऱ्या होतात. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी वाढले असून, अनेकांना रात्री उशिरा घरी परतावे लागते. रात्री ९.४९ नंतर बस न मिळाल्याने रहिवाशांना ऑटोरिक्षांवर अवलंबून राहावे लागते, तसेच बहुतेक वेळा ऑटोरिक्षा देखील उपलब्ध होत नाही.

गितेंद्र मिर्लेकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, “रहिवाशांच्या सोयीसाठी आणि रात्रीच्या वेळी सुरक्षित प्रवासासाठी ही मागणी करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा.”
याबाबत त्यांनी आज सोमवार दि २५ मे रोजी महापौर अजीव पाटील यांची भेट घेतली असता पाटील यांनी याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करू असे म्हटले आहे. तसेच वसई विरार ला १०० अतिरिक्त बसेस येणार आहेत तेव्हा ह्या मुद्यावर नक्कीच तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे. त्यासोबत विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांनासुद्धा पत्र देण्यात आले आहे, त्यांनी देखील ह्या मुद्यावर लवकरात लवकर विचार करू असे सांगून सकारात्मक निर्णय दिला आहे. ग्राहक सेवा संस्थेने परिवहन आयुक्त यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे.
सध्या विरार पश्चिम परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या मागण्या वाढल्या आहेत. रहिवाशांनी या मुद्द्यावर महापालिका प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.









