होम गुन्हे जगत लग्नास नकार देणाऱ्या सासूचा गोव्यात खून; पळालेल्या नराधमाला मिरा-भाईंदर पोलिसांकडून २४ तासांत...

लग्नास नकार देणाऱ्या सासूचा गोव्यात खून; पळालेल्या नराधमाला मिरा-भाईंदर पोलिसांकडून २४ तासांत बेड्या

83
0
लग्नास नकार देणाऱ्या सासूचा गोव्यात खून; पळालेल्या नराधमाला मिरा-भाईंदर पोलिसांकडून २४ तासांत बेड्या

लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्याचा राग मनात धरून गोव्यात एका ५८ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून पसार झालेल्या आरोपीला पकडण्यात मिरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखा (कक्ष-४) च्या पथकाला मोठे यश आले आहे. गोव्यात गुन्हा करून महाराष्ट्रात लपलेल्या या आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. सागर रमेश राऊळ (वय ३४, रा. जुने गोवा, मूळ रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर राऊळ याने फिर्यादीच्या लहान बहिणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, फिर्यादीची आई सौ. शैला घाडी (वय ५८) यांनी या विवाहाला स्पष्ट विरोध केला होता. याच जुन्या रागातून आरोपीने १९ मे २०२६ रोजी उत्तर गोव्यातील साखळी (डिचोली) येथील चिकणे कुडणे भागातील घरात बेकायदेशीर प्रवेश केला. दुपारच्या सुमारास घरात कोणी नसताना त्याने शैला घाडी यांची गळा चिरून निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे तर, मृतदेहाच्या अंगावरील सोन्याची चेन आणि मोबाईल फोन घेऊन तो तिथून पसार झाला. याप्रकरणी डिचोली पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासाच्या जोरावर आवळल्या आवळल्या बेड्या: गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन डिचोली पोलिसांनी आरोपीची शोध पत्रिका जारी केली होती. या माहितीच्या आधारे मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने समांतर तपास सुरू केला. सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि २० मे रोजी त्याला मिरा रोड परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेली सोन्याची चेन आणि मोबाईल असा एकूण १,११,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त संदिप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या पथकाने केली.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें