वसई-विरारच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्ते आणि उड्डाणपूल अशा कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली असली, तरी एक वर्ष उलटून गेल्यानंतरही सत्ताधाऱ्यांना निविदा काढण्याची क्षमता नसल्याचा जोरदार हल्ला बहुजन विकास आघाडीचे (बविआ) अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी चढवला. वसई चिंचोटी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बविआ आणि भाजपा यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
४ रेल्वे उड्डाणपूल, अंतर्गत उड्डाणपूल आणि ७ मुख्य रस्ते अशी एकूण ४,२०० कोटी रुपयांची कामे आमच्या कार्यकाळात मंजूर करुन घेतली मात्र, सतांतराला एक वर्ष पेक्षा जास्त काळ लोटला, तरी सत्ताधाऱ्यांना साधी निविदा काढण्याचीही कुवत नाही असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बविआने मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. याच अनुषंगाने वसई-विरार शहरातील विविध भागांत विभागनिहाय कार्यकर्ता मेळावे सुरु झाले आहे. रविवार २ नोव्हेंबर रोजी नायगाव पूर्वेकडील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी चिंचोटी येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे.









