वसई-विरार शहरात गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. रस्ते, रेल्वे-बस स्थानके, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा, सोसायट्या अशा सर्वच ठिकाणी कुत्र्यांची मोठी टोळी दिसते. लसीकरणाचा अभाव आणि निर्बीजीकरण प्रक्रियेकडे दुर्लक्ष यामुळे श्वानदंशाच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. यातून रेबीजसारख्या प्राणघातक आजाराचा धोका शहरावर निर्माण झाला आहे.
रेबीज हा ९९.९% प्राणघातक आजार आहे.
कुत्रा चावल्यानंतर वेळीच लस घेतली नाही तर मृत्यू अटल असतो. हे टाळण्यासाठी आता वसई-विरार शहर महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग व विविध स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन रेबीजमुक्त वसई-विरार ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे.
काय होणार या मोहिमेत ?
- शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांना मोफत Anti-Rabies लस देण्यात येणार आहे
- पाळीव कुत्र्यांचेही मोफत लसीकरण करता येणार आहे
- २०३० पर्यंत वसई-विरारला पूर्णपणे रेबीजमुक्त करण्याचे उद्दिष्ट
- ही मोहीम केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृती योजना (NAPRE) चा भाग आहे
तुम्ही कसे सामील व्हाल?
महापालिकेने एक सोपा मार्ग उपलब्ध करून दिला आहे:
१. दिलेला QR कोड स्कॅन करा

२. कुत्रा कुठे आहे, किती आहेत हे सांगाणारा छोटा ऑनलाइन फॉर्म भरा
३. स्वयंसेवी संस्थेचे पथक तुमध्यापर्यंत येऊन लसीकरण करेल
किंवा थेट संपर्कः ९८३४१७७२६६ (व्हॉट्सअॅप/कॉल) करावा.
प्रशासनाचे आवाहन
“एका लसीमुळे एक प्राण वाचू शकतो. भटक्या कुत्र्यांना हाकलू नका, लसीकरण करून घ्या. पाळीव कुत्रे असतील तर त्यांनाही लस द्या. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे यावे,” असे आवाहन महापालिका आयुक्त आणि पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
श्वानदंशाच्या भीतीपासून मुक्ती हवी असेल तर ही मोहीम यशस्वी करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.








