वसई न्यायालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जप्त केलेली मालमत्ता परत मिळवण्यासाठी (रिटर्न ऑफ प्रॉपर्टी) आवश्यक असलेली सरकारी वकिलांची संमती (स्टे) देण्यासाठी चक्क २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सरकारी वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. भूपेश पुरंदरे असे अटक करण्यात आलेल्या सरकारी वकिलाचे नाव असून, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील नीलम एन. पांचाळ आहेत. त्यांच्या एका प्रकरणातील मालमत्ता परत मिळवण्यासाठी सरकारी वकिलाच्या मंजुरीची आवश्यकता होती. या छोट्याशा कामासाठी सरकारी वकील भूपेश पुरंदरे यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. एका कायदेशीर कामासाठी लाच द्यावी लागत असल्याने तक्रारदार नीलम पांचाळ यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.
तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वसई न्यायालय परिसरात सापळा रचला. सकाळी सरकारी वकील भूपेश पुरंदरे यांनी त्यांच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. वसई तालुक्यात एखाद्या सरकारी वकिलाला लाच घेताना पकडण्याची ही पहिलीच घटना असल्याने न्यायालयीन वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर आरोपी वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील सुनावणीसाठी त्यांना लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.









