वसई सातवली येथील हनुमंत विद्यामंदिर येथील १२ वर्षीय विद्यार्थीनी काजल हिला वर्गशिक्षिकेने उठाबशाची शिक्षा दिल्याने तिच्यावर परिणाम झाला व निरपराध मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब घडली आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर घटनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसई-विरार जिल्हा सरचिटणीस रोहित सासणे यांनी बुलंद आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले. आज या कुटुंबाला विविध सामाजिक कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी भेट देऊन धीर देऊन गेले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसई-विरार जिल्हाध्यक्ष मनोज म्हात्रे यांनी स्थानिक पदाधिकारी रजाक भाई, समुद्दीन शेख उपाध्यक्ष बोईसर यांसह मृत मुलीचे वडील सिकंदर गोडे व मुलीची आई यांच्या कुटुंबाला भेट दिली असता गंभीर बाब समोर आली.
“दोन-तीन दिवस हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत होता, परंतु १० बाय १० च्या खोलीत राहणाऱ्या या अत्यंत साध्या कुटुंबाला ना शासकीय मदत मिळाली, ना प्रशासकीय, ना इतर कोणत्याही संस्थांकडून दिलासा मिळाला. ही अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी बाब आहे.” असे मनोज म्हात्रे म्हणाले, पुढे त्यांनी मागणी केली की अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी सर्व शाळांच्या संचालक मंडळांनी खालील गोष्टी सक्तीने राबविणे अत्यावश्यक आहे:
१. विद्यार्थ्यांचे नियमित हेल्थ चेकअप
२. गुणवत्तापूर्ण व प्रशिक्षित शिक्षकांची योग्य निवड प्रक्रिया
३. शाळांमध्ये शिक्षेच्या नावाखाली कोणत्याही शारीरिक यातना दिल्या जाणार नाहीत याची काटेकोर अंमलबजावणी
तसेच काजलला उपचारासाठी नेण्यात आलेल्या आस्था हॉस्पिटलमध्ये योग्य निदान न झाल्याचा संशय व्यक्त होत असल्याने त्या हॉस्पिटलची तात्काळ चौकशी करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे प्रकरण न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करून कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याची हमी देण्यात आली आहे.
८ नोव्हेंबर रोजी श्री हनुमंत विद्यामंदिर (हनुमंत हायस्कूल), वसई येथील सहावीच्या विद्यार्थिनी काजल हिच्यासह जवळपास ५० उशिरा आलेल्या विद्याथ्यांना डोक्यावर शाळेची बॅग ठेवून उठक-बैठका करण्यास सांगितल्या होत्या. त्यानंतर काजलची तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यानंतर तीचा मृत्यु झाल्याची हृदयद्रावक घटना वसई येथे घडली आहे. ही शिक्षा देणाऱ्या शिक्षिका ममता यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. त्या २००९ पासून शाळेत कार्यरत होत्या.
उशिरा शाळेत आल्याच्या शिक्षेसाठी १०० उठक-बैठका करायला लावल्यानंतर प्रकृती बिघडून मृत्यू झालेल्या १३ वर्षीय काजल गौर हिच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात तिला गंभीर ऍनिमियाची (रक्ताची कमतरता) असल्याचे निष्पन्न झाले आहे. ऍनिमियामुळे शरीरात पुरेसे निरोगी लाल रक्तपेशी तयार होत नाहीत, ज्यामुळे कमजोरी, थकवा आणि गंभीर अवस्थेत अवयवांवर ताण येऊ शकतो.
शाळेच्या म्हणण्यानुसार, काजलच्या “कमकुवत तब्येती”ची त्यांना कल्पना होती आणि पालकांना उपचार घेण्याचा सल्ला दिला होता; मात्र शिक्षिकांना तिची लहान उंचीमुळे ओळख पटली नाही. “त्या दिवशी इतके विद्यार्थी होते की शिक्षिकांना ती दिसलीच नाही,” असे प्राचार्य रामाश्रय यादव यांनी सांगितले. शिक्षिका ममता यादव यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले असून शाळा पोलिस आणि शिक्षण विभागाच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहे.
मात्र काजलचे वडील सिकंदर (मजूर) यांनी शाळेची ही बाजू सपशेल फेटाळली. “शाळेने कधीही आम्हाला तिच्या तब्येतीबाबत सांगितले नव्हते. जर माहिती होतेच तर इतकी कठोर शिक्षा का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच “शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले आहेत,” असा गंभीर आरोपही त्यांनी लावला.
८ नोव्हेंबर रोजी घरी आल्यानंतर काजलला संपूर्ण शरीर दुखत असल्याची तक्रार होती. दुसऱ्या दिवशी ती घरीच बेशुद्ध पडली. आईने तात्काळ तिला वसई पश्चिमेतील आस्था रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी उबळ आल्याचे (seizures) निदान केले आणि लक्ष्मी रुग्णालयात हलवले. गुरुवारी प्रकृती आणखी खालावल्याने तिला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शनिवारी तिचा मृत्यू झाला.
प्राथमिक अहवालात फुफ्फुसात पाणी साठणे (pulmonary oedema) आणि प्लीहा मोठी होणे (splenomegaly) आढळले हे दोन्ही अॅनिमियाशी संबंधित असतात. अंतिम मत मात्र रासायनिक तपासणी अहवाल येईपर्यंत राखीव ठेवण्यात आले आहे.
वालिव पोलिसांनी अपमृत्यू नोंद (ADR) केली असून फॉरेन्सिक अहवालानंतरच गुन्हा दाखल होईल की नाही हे ठरणार आहे. “शारीरिक ताण किंवा अतिआयासामुळे मृत्यू झाल्याचे सिद्ध झाल्यास एफआयआर दाखल करू,” असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुर्गे यांनी सांगितले.
काजलच्या मृत्यूने संतापलेल्या पालकांनी आणि रहिवाशांनी गेल्या आठवड्यात शाळेबाहेर जोरदार निदर्शने केली. शाळेत मारहाण आणि शारीरिक शिक्षा नेहमीच दिल्या जातात, तसेच दहावीपर्यंत वर्ग चालवण्याची परवानगी नसतानाही चालवले जातात, असा आरोप त्यांनी केला.
शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली असून पोलिसांनी शिक्षिका आणि शाळा व्यवस्थापनाची चौकशी नोंदवली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शारीरिक शिक्षा देणे दखलपात्र गुन्हा आहे.
शनिवारी संध्याकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनी कुटुंबाला भेट देऊन सहानुभूती दर्शवली आणि शाळा व नाव नोंदवलेल्या शिक्षिकेविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.








