होम गुन्हे जगत विरारमध्ये महसूल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; सहकाऱ्याचा मृत्यू, खदान परिसरात खळबळ

विरारमध्ये महसूल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; सहकाऱ्याचा मृत्यू, खदान परिसरात खळबळ

42
0
Image Source : https://marathi.abplive.com/
Image Source : https://marathi.abplive.com/

विरार पूर्वेच्या शिरगाव रायपाडा परिसरात मंगळवारी दुपारी एका भीषण हत्याकांडाची घटना घडली. बेकायदेशीर दगडखाणीच्या मुद्द्यावर आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून क्रूर हत्या करण्यात आली. याच घटनेत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला झाला. ते गंभीर जखमी असून उपचाराधीन आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरगाव येथील एका खदानीत बेकायदेशीर स्फोट घडवून उत्खनन केले जात असल्याची तक्रार आत्माराम पाटील यांनी महसूल खात्याकडे केली होती. या तक्रारीमुळे खदान मालकांशी त्यांचा वाद निर्माण झाला होता. मंगळवारी दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान आत्माराम पाटील आणि मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे खदानीची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी गेले होते. यावेळी खदानाशी संबंधित व्यक्तींनी प्रथम मंडळ अधिकाऱ्यांच्या वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने प्रभाकर पाटील यांच्यावर हल्ला केला. नंतर आत्माराम पाटील यांच्यावर दगड फेकून निर्घृण हल्ला करण्यात आला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विरार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

ही घटना माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्याकडे पुन्हा लक्ष वेधते आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अशा प्रकारचे हल्ले वाढत असल्याने महसूल विभागातही खळबळ उडाली आहे.