Home गुन्हे जगत नालासोपाऱ्यात १५०० रुपयांत गर्भपाताच्या गोळ्या

नालासोपाऱ्यात १५०० रुपयांत गर्भपाताच्या गोळ्या

150
0
Image Source : NDTV Marathi
Image Source : NDTV Marathi

वविशमपाच्या आरोग्य विभागाची धडक कारवाई

नालासोपारा पूर्वेतील धानीव बाग येथील शाहीन क्लिनिकवर वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली. मान्यता नसताना बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉ. जबीउल्ला खान (बीएएमएस) याच्यावर पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

पालिकेच्या आरोग्य विभागाला गुप्त माहिती मिळाली की, जबीउल्ला खान हा स्त्रीरोगतज्ञ नसतानाही फक्त १५०० रुपयांत गर्भपाताच्या गोळ्‌या पुरवत होता. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ८ डिसेंबर रोजी डमी रुग्ण पाठवून तपासणी केली असता हे प्रकरण उघडकीस आले.

क्लिनिकमध्ये बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला. याप्रकरणी जबीउल्ला खान याच्याविरुद्ध भा.जु.सं. कलम ३१८ (४) तसेच मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्टच्या कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसईतही सोनोग्राफी केंद्र सील

त्याचवेळी वसईतील ईश्वर्या हेल्थकेअर प्रा. लि. या सोनोग्राफी केंद्रावरही छापा टाकण्यात आला. पीसीपीएनडीटी कायद्याचे घोर उल्लंघन करत असल्याचे आढळल्याने १ डिसेंबर रोजी केंद्रातील अल्ट्रासोनोग्राफी मशीन व मुद्देमाल जप्त करून सील करण्यात आले आहे. या केंद्राविरुद्धही कायदेशीर कारवाई सुरू आहे.

आरोग्य विभागाच्या समुचित प्राधिकाऱ्या डॉ. भक्ती चौधरी यांनी सांगितले की, “बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात करणाऱ्या केंद्रांवर सतत धडक कारवाया सुरू राहतील. नागरिकांना अशा केंद्रांची माहिती गोपनीय राहील याची खात्री देत हेल्पलाइनवर (१८००-२३३-४४७५ किंवा १०४) कळवावे.”

या सलग कारवायांमुळे नालासोपारा-वसई परिसरातील अवैध आरोग्य केंद्रांचा पर्दाफाश होत असून, पालिकेच्या तडाखेबंद भूमिकेला नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे.