Home ताज्या बातम्या २६ रुपयांत दीड किमी; वसई-विरारात मीटर रिक्षांची क्रांती, आमदार स्नेहा दुबेंच्या पाठपुराव्याला...

२६ रुपयांत दीड किमी; वसई-विरारात मीटर रिक्षांची क्रांती, आमदार स्नेहा दुबेंच्या पाठपुराव्याला यश

111
0
२६ रुपयांत दीड किमी; वसई-विरारात मीटर रिक्षांची क्रांती, आमदार स्नेहा दुबेंच्या पाठपुराव्याला यश

वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव या चारही शहरांतील प्रवाशांसाठी प्रथमच मीटरने रिक्षा धावू लागल्या आहेत. यामुळे वर्षानुवर्षे होणाऱ्या अवाजवी भाडे आकारणीला, भाडे नाकारण्याला आणि गैरवर्तनाला आता चाप बसेल, असा विश्वास प्रवाशांमध्ये निर्माण झाला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालक मीटर बंद ठेवून मनमानी भाडे आकारत होते. विद्यार्थिनी, महिला, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या सोडवण्यासाठी वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार १५ नोव्हेंबरपासून ही सेवा अधिकृतपणे सुरू झाली.

शनिवारी आमदार स्नेहा दुबे-पंडित, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक उगळे आणि रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवून या सेवेला शुभारंभ केला.

नवे मीटर भाडे (१५ नोव्हेंबर २०२५ पासून लागू):

  • पहिले १.५ किमी, रु. २६ (मध्यरात्री रु. २९)
  • ४.१ किमी, रु. ७० (मध्यरात्री रु. ८८)
  • ६.७ किमी, रु. ११५ (मध्यरात्री रु. १४४)

शेअरिंग रिक्षा कायम राहणार

मीटर रिक्षा सुरू झाल्या तरी शेअरिंग रिक्षा बंद होणार नाहीत. ज्या प्रवाशांना कमी भाड्‌यात प्रवास करायचा असेल, ते तिघे-चौघे एकत्र बसून शेअरिंगनेही प्रवास करू शकतील.

जनजागृती आणि सुरुवातीला संमिश्र प्रतिसाद

सुरुवातीला काही रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे परिवहन विभाग आणि रिक्षा संघटना यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली जात आहे. “काही अडचणी आल्या तरी त्या लवकरच सोडवू, ही सेवा १००% यशस्वी करू,” असे आश्वासन परिवहन विभागाने दिले आहे.

वसई-विरारमधील लाखो प्रवाशांसाठी हा खरंच ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. आता फक्त मीटर चालू ठेवणे आणि प्रवाशांनीही निश्चित भाडे देण्याची सवय लावणे, एवढेच आव्हान उरले आहे !