वसई-विरार शहरात गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच साखळीतील महत्त्वाची कारवाई करत आचोळे पोलिसांनी सराईत रिक्षाचोर प्रकाश पुकराज त्रिवेदी (वय ३३, रा. विरार पूर्व, कुंभार पाडा) याला अटक केली, त्याच्याकडून सुमारे १ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या चार चोरीच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
प्रकाशवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ८ गुन्हे दाखल आहेत, त्यामध्ये विरार पोलीस ठाणे ४ गुन्हे, वालीव १ गुन्हा, नयानगर १ गुन्हा आणि काशीमिरा पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत. – नुकतीच नालासोपारा पूर्वेतील आचोळे गाव परिसरातील रिक्षाचालक जितेश ठाकूरदीन गाँड यांची रिक्षा चोरीला गेल्यानंतर आचोळे पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळावरील तांत्रिक माहिती व गोपनीय बातम्यांवरून पोलिसांनी विरार पूर्वेतील कुंभार पाडा येथे सापळा रचला आणि प्रकाशला रंगेहाथ पकडले.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, परिमंडळ-२ पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींजी, सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आचोळे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक मंगेश वहणे, गुरुदास मोरे, दत्तात्रय दाईंगडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली.
काही महिन्यांपूर्वी तुळींज पोलिसांनी संजय लालमन यादव या दुसऱ्या सराईत रिक्षाचोराला अटक करून नालासोपारा, भाईंदर व दहिसर परिसरातील ३ चोरीच्या रिक्षा जप्त केल्या होत्या. त्याच्यावरही ६ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
वसई-विरारमधील रिक्षाचालकांनी सातत्याने रात्रीच्या वेळी गाड्या उभ्या करताना साखळी-लॉक वापरण्याचे आणि सीसीटीव्ही कव्हरेज असलेल्या जागी पार्किंग करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.








