होम वसई - विरार वसई-विरार महापालिकेकडून जिल्हा परिषद शाळांतील २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी २ कोटींचा निधी...

वसई-विरार महापालिकेकडून जिल्हा परिषद शाळांतील २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी २ कोटींचा निधी मंजूर

27
0
वसई-विरार महापालिकेकडून जिल्हा परिषद शाळांतील २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी २ कोटींचा निधी मंजूर

वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महासभेत हा प्रस्ताव पारित झाला असून, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी साहित्य वाटप केले जाणार आहे.

महापालिका स्थापन झाल्यानंतर १६ वर्षे उलटली तरी महापालिकेची स्वतःची शाळा उभी राहिलेली नाही. मात्र, महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या ११६ जिल्हा परिषद शाळांतील जवळपास २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे यंदाही शैक्षणिक साहित्य दिले जाईल. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत ११,८९२ विद्यार्थी, पाचवी ते सातवीपर्यंत ६,८७० विद्यार्थी आणि आठवी ते दहावीपर्यंत १,८६२ विद्यार्थी यांचा समावेश आहे.

महासभेत काही नगरसेवकांनी साहित्य खरेदीत गैरव्यवहाराची शक्यता लक्षात घेता थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची मागणी केली होती. मात्र, पालकांना बँक खाते उघडण्यासाठी होणारी फरफट आणि साहित्य वेळेवर मिळण्याच्या दृष्टीने अखेर साहित्य स्वरूपातच देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापौर अजीव पाटील यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य मिळावे यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना दप्तर, पेन्सिल बॉक्स, वह्या, ड्रॉईंग बुक, कंपास बॉक्स, वॉटर कलर इत्यादी आवश्यक वस्तू पुरवल्या जाणार आहेत.