Home संपादकीय नव्या उजेडाची सुरुवात…

नव्या उजेडाची सुरुवात…

199
0

प्रिय वाचक मित्रांनो, आजचा दिवस हा आमच्यासाठी एक तारीख नाही आहे, तर एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आत्ताच दिवाळी सण होऊन गेला, सर्वांच्या आयुष्यामध्ये दिवाळीच्या रोषनाईने हर्षोल्हास निर्माण झाला आहे. प्रत्येकाला जगण्याची नवीन उमेद घेऊन हा सण आला आहे. त्या निमित्ताने आम्हीदेखील समाज कार्यासाठी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची निवड केली आहे आणि जनतेचा लोकमानस या साप्ताहिक वृत्तपत्राच्या पहिल्या अंकासोबत आम्ही आपल्या घरी पोहोचत आहोत. मराठी पत्रकारीतेच्या समृध्द परंपरेच्या वारशातून प्रेरित होऊन, आम्ही हे वृत्तपत्र सुरु करीत आहोत, जो केवळ बातम्यांचा संग्रह नसून, तुमच्या जीवनातील एक सच्चा साथीदार बनेल.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मराठी वृत्तपत्रसृष्टीची ओळख करुन देण्यासाठी, आम्हाला आठवण होते ती दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पासून ते शोषितांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक आणि बहिष्कृत भारत ते गिरणी कामगार व मजूरांवर आपले आयुष्य घालविलेले कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे नवाकाळ व ज्यांच्या एका आवाजाने समस्त हिंदू एकावटला अशा महान व्यंगचित्रकार, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सामना यांची. या सर्व वृत्तपत्रांनी समाजप्रबोधनाची एक ज्योत पेटवली. पण काळाच्या ओघात आणि संगणकीकरणामुळे वृत्तपत्राचं महत्त्व कमी होत गेलं आणि त्याची जागा घेतली डिजिटल युगाने आज आम्ही हया दोन्ही आघाड्यांवर काम करण्याचे योजिले आहे, म्हणून आम्ही फक्त वृत्तपत्रावरच अवलंबून न राहता सोबत वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून देखील सतत आपल्या सोबत राहणार आहोत. ज्याद्वारे आजच्या वेगवान जगात आपले हे वृत्तपत्र स्थानिक घडामोडी, सामाजिक मुद्दे, सांस्कृतिक वैभव आणि विकासाच्या बातम्या तुमच्यापर्यंत जलद पोहचविण्याचे काम करेल. आमचा उद्देश स्पष्ट आहे : सत्याची बाजू घेणे, वाचकांना प्रेरित करणे आणि समाजाच्या प्रगतीचा एक कणखर आवाज बनणे.

या वृत्तपत्रामध्ये आपल्याला स्थानिक बातम्या, लोकांच्या समस्या आणि सांस्कृतिक कार्यक्रांची माहिती मिळेल. पण हे वृत्तपत्र फक्त आमचे नाही; ते तुमचे आहे. तुमच्या सुचना, लेख आणि कल्पना आम्हाला अधिक मजबूत करतील. आम्ही वचन देतो की, आपल्या प्रत्येक अंकातून तुम्हाला नवी दृष्टी मिळेल, नवे विचार मिळतील आणि नवे ध्येय सापडतील.

साप्ताहिक जनतेचा लोकमानस सोबतचा हा प्रवास यशस्वी होण्यासाठी तुमची साथ अपेक्षित आहे. मग चला, आपण सर्व मिळून एक चांगले भविष्य घडवूया !

धन्यवाद,
गितेंद्र कमलाकर मिर्लेकर (मुख्य संपादक)