विरार पश्चिमेतील टाऊनशीप भागात वृत्तपत्र विक्रेता गणपत पवार यांच्या २८ वर्षांपासून चालत असलेल्या वृत्तपत्र स्टॉलवर वसई-विरार महानगरपालिकेने तोडक कारवाई केली आहे. या स्टॉलवर केवळ वृत्तपत्र विक्रीच होत असल्याने वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होत नव्हता, असे पोवार यांनी सांगितले. तरीही पालिकेने स्टॉल हटवल्याने त्यांचा दीर्घकाळचा व्यवसाय एका झटक्यात उद्ध्वस्त झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा स्टॉल सुरू होता. पालिकेच्या कारवाईदरम्यान गणपत पवार यांनी स्टॉल तोडू नये अशी विनंती केली होती. मात्र, पालिकेने ही विनंती धुडकावून लावली.
ही घटना पालिकेच्या अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या व्यापक मोहिमेचा भाग असल्याचे दिसते. मात्र, छोट्या व्यावसायिकांवर अशी अचानक कारवाई कशी न्याय्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गणपत पोवार यांच्यासारख्या सामान्य विक्रेत्यांचा उदरनिर्वाह या स्टॉलवर अवलंबून होता. या प्रकारच्या कारवाईमुळे छोट्या व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








