वसई-विरार परिसरात पावसाळी पूर हा वार्षिक समस्या बनली आहे. यावर्षीही बोळींज (विरार पश्चिम) ते नालासोपारा दरम्यानच्या खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात माती भराव टाकण्याचे काम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भरावामुळे खाडीचे नैसर्गिक पात्र अरुंद होऊन पाण्याचा निचरा अडकला आहे, ज्यामुळे मुसळधार पावसात आसपासच्या वसाहतींमध्ये पूर येण्याची शक्यता वाढली आहे.
नागरिकांच्या तक्रारीनुसार, खाडीच्या किनाऱ्याजवळ आणि थेट पात्रातच माती टाकण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षीही या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे रहिवाशांना मोठे नुकसान सहन करावे लागले. जागरूक नागरिक योगेश वैद्य यांनी याबाबत वसई तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी खाडी पात्र मोकळा करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वसई तहसीलदार दीपक गायकवाड यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित भागातील मंडळ अधिकारी व तलाठी यांना स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेनेही प्रभाग अधिकाऱ्याला पाहणी करण्यास सांगितले आहे.
नैसर्गिक जलमार्ग बुजवणे हे पर्यावरण आणि नागरिकांच्या सुरक्षेला हानिकारक आहे. वसई-विरारसारख्या भरभराटीच्या उपनगरात विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे गरजेचे आहे.








