होम वसई - विरार वसई-विरार महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड

वसई-विरार महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड

36
0
वसई-विरार महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड

वसई-विरार: शहरातील सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खाद्य घालण्यामुळे होणारी अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्याच्या धोक्यांना लक्षात घेता वसई-विरार महानगरपालिकेने (VVMC) कडक पाऊले उचलली आहेत. आता रस्ते, बस स्टँड, मैदाने, धार्मिक स्थळे किंवा तलावाच्या किनाऱ्यावर पक्ष्यांना दाणे टाकणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने याबाबत सूचना फलक लावण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी दादरसारख्या भागात कबुतरांना खाद्य देण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर वसई-विरार महापालिकेनेही हा निर्णय घेतला आहे. पक्ष्यांच्या विष्ठा, पिसे आणि कुजलेले खाद्य यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि जीवाणूजन्य आजारांचा धोका वाढतो, अशी नागरिकांची तक्रार होती.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी सांगितले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. सध्या फक्त वसई रेल्वे स्थानक परिसरात सूचना फलक दिसत आहेत, इतर भागांत जनजागृती अपुरी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रहिवासी सोसायटी, टेरेस आणि इमारती आवारातही कबुतरांची संख्या वाढल्याने आरोग्य समस्या निर्माण होत असल्याने खासगी जागीही कारवाईची मागणी होत आहे.