होम गुन्हे जगत वसईत पुन्हा सापडले मानवी सांगाडे; आनंद नगरमधील मोकळ्या भूखंडावर कवटी-हाडे!

वसईत पुन्हा सापडले मानवी सांगाडे; आनंद नगरमधील मोकळ्या भूखंडावर कवटी-हाडे!

30
0
Image Source : NDTV
Image Source : NDTV

वसईच्या आनंद नगर परिसरात एका मोकळ्या भूखंडावर मानवी कवटी व हाडे विखुरलेली आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. रमाबाई चाळीच्या मागील खुल्या जागेवर ही भयावह घटना उघडकीस आली.

स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून या भूखंडावर वारंवार आग लागत होती. रविवारी संध्याकाळी क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या मुलांना कवटीसह इतर हाडे दिसली. त्यांनी तातडीने मोठ्यांना सांगितल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सांगाड्याजवळ काही नाणीही सापडल्याची माहिती आहे.

माणिकपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीमला देखील बोलावण्यात आले आहे.

यापूर्वी सुमारे तीन महिन्यांपूर्वी याच आनंद नगर-माणिकपूर परिसरातील एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीत १५० हून अधिक हाडे आणि कवटी सापडली होती. एकाच भागात वारंवार अशा घटना घडत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीती आणि संशयाचे वातावरण आहे. पोलिसांनी दोन्ही घटनांची जोडणी तपासण्यास सुरुवात केली आहे.