Home वसई - विरार बोळींज म्हाडा वसाहतीतील नागरिकांचा म्हाडा प्रशासनावर संताप; क्षितिज ठाकूर यांना, फसवणूक व...

बोळींज म्हाडा वसाहतीतील नागरिकांचा म्हाडा प्रशासनावर संताप; क्षितिज ठाकूर यांना, फसवणूक व असुविधांबाबत निवेदन

231
0
बोळींज म्हाडा वसाहतीतील नागरिकांचा म्हाडा प्रशासनावर संताप; क्षितिज ठाकूर यांना, फसवणूक व असुविधांबाबत निवेदन

विरार पश्चिमेतील बोळींज येथील म्हाडा संकुलातील रहिवाशांनी माजी आमदार तथा बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांची भेट घेऊन म्हाडा प्रशासनावर गंभीर आरोप करणारे निवेदन सादर केले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

याबाबात सविस्तत माहिती घेता असे समजले की, २०१४ ते २०२४ पर्यंत सदनिका घेतलेल्या अल्प व मध्यम उत्पन्न गटातील हजारो नागरिकांनी आपल्या कष्टाच्या पैशांतून व कर्ज काढून घरे विकत घेतली. मात्र म्हाडा प्रशासनाने न्यू सातारा मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह बँकेला येथील घरे १२ ते १५ टक्के कमी दराने विकण्यास परवानगी दिली ज्यामुळे जुन्या रहिवाशांना २.७९ लाख ते ५.०१ लाख रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. येथील नागरिकांनी वेळोवेळी म्हाडा प्रशासनाला याबाबत निवेदने दिलेली आहेत परंतु म्हाडा प्रशासनाने त्यांना कोणत्याही प्रकारचे ठोस आश्वासन दिलेले नाही.

याबाबत येथील नागरिकांचे म्हणणे आहे की, “आम्ही घर खरेदी केलेली किंमत व आता म्हाडा ज्या किंमतीमध्ये घरे विकते यामधील असलेल्या फरकाची रक्कम आमच्या खात्यात जमा करावी.”

२०१६ ते २०१८ मध्ये ३३० स्क्वे. फुट सदनिकांची किंमत मूळ वचनपत्रात रु. २३,२८,५६६/- होती, ती किंमत २०२४ -२०२५ मध्ये रु. २०,४९,१३८/- एवढी कमी करण्यात आली. (नुकसान रु. २,७९,४२८/-).

४४० स्क्वे. फुट सदनिकांची किंमत मूळ वचनपत्रात रु. २८,७८,०००/- होती, ती किंमत २०२४ – २०२५ मध्ये रु. २५,३२,६४०/- (नुकसान रु. ३,४५,३६०/-).

६७५ स्क्वे. फुट सदनिकांची किंमत मूळ वचनपत्रात रु. ४१,८१,८३४/- होती, ती किंमत २०२४ २०२५ मध्ये रु. ३६,८०,०१४/- (नुकसान रु. ५,०१,८२०/- फरक),

म्हणजे जेथे दिवसांगणित जमिनीची किमती वाढत आहे तेथे बोळींज म्हाडामध्ये मात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वारे वाहत आहेत. जेथे किंमती वाढल्या पाहिजे तेथे लाखो रुपयांनी किंमती कमी केलेल्या आहेत. म्हणजेच ज्या लोकांनी कर्ज काढून आपले दागिने जमिनी गहाण ठेवून विकून म्हाडाची घरे घेतली आहेत त्यांच्या सोबत म्हाडा प्रशासनाने फसवणूक केली आहे. न्यू सातारा मल्टिपर्पज बँकेला हाताशी धरून कमी किंमतीमध्ये येथील घरे विकलेली आहेत.

मुख्यमंत्री, सत्ताधारी आमदार ते म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देखील याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला परंतु सर्व ठिकाणांहून फक्त निराशा पदरी पडली आहे. प्रशासनाने या नागरिकांना वाऱ्यावर सोडलेले आहे. येथील रहिवाशांचा त्रास येथेच संपत नाही तर भरमसाठ सेवा शुल्क घेतले असताना देखील येथील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सेवा प्राधिकारणाकाडून पुरवल्या जात नाहीत.

गुजरात गॅसच्या पाईपलाईनसाठी म्हाडा प्रशासनाकडे पाठपुरवठा करून देखील म्हाडाने त्यास मान्यता दिली नाही. येथील इमारतीमध्ये पाणी साठविण्यासाठी योग्य व्यवस्था नाही. सोबतच पाणी पुरवठा देखील व्यवस्थित होत नाही. स्थानिक पाताळीवर पाण्याच्या प्रश्नाबाबत मोर्चे काढण्यात आले, परंतु यामध्ये स्वयंघोषित समाजसेवकांकडून फक्त बॅनरबाजी झाली, येथील जनतेला कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही किंवा प्रश्न सोडविण्यात आले नाही. येथे पाण्याचा प्रश्न जैसे-थे असाच आहे असे येथील लोकांकडून सांगण्यात आले. जनरेटरची व्यवस्थित सुविधा नाही. येथील बहुतेक इमारतीमध्ये लिफ्टला जनरेटरचा बॅकअप नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यावर लिफ्टमध्ये नागरिक अडकण्याच्या घटना वारंवार होत आहे. अंतर्गत लीकेजचा देखील मुद्दा कळीचा आहे. ड्रेनेजमुळे येथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दर पंधरा दिवसांनी येथील गटारे वाहून जात आहेत. व परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यासोबतच अशिक्षित आणि उध्दट सुरक्षा रक्षक अशा विविध समस्यांनी येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत. याबाबत देखील म्हाडा प्रशासनाला वेळोवेळी तक्रार दिलेली आहे पण, म्हाडा प्रशासन त्याकडे पूर्णपणे कानाडोळा करत आहे.

म्हाडा प्रशासनाने येथील लोकांची फसवणूक करत करोडो रुपये लुटले आहेत. परंतु याबाबत दाद मागायला गेल्यास कोणत्याही प्रकारचे आश्वासन देण्यात येत नाही या सर्व त्रासाबाबत येथील शिवप्रतिष्ठान वेल्फेअर असोसिएशन आणि म्हाडा संकुल समिती यांनी एकत्र येऊन माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना निवेदन सादर केले. याबाबत क्षितिज ठाकूर यांनीही येथील नागरिकांचे म्हणणे एकूण याबाबत आपण म्हाडा प्रशासन याच्यासोबत बोलून म्हाडा कोकण मंडळाच्या वतीने इतर कोणत्याही ठिकाणी जर आगाऊ रकमेचा परतावा दिला असेल तर त्याबाबतची माहिती घेऊन या समस्येचे निराकरण करू आणि आपणास न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान म्हाडा प्रशासनाकडून येथील नागरीकांच्या समस्येचे निराकरण होत नाही आणि जास्तीचे घेतलेले पैसे येथील नागरीकांना परत केले जाणार नसतील तर भविष्यात मोठा मोर्चा म्हाडा प्रशासनावर काढण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.