प्रतिनिधी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे सोमवार ८ डिसेंबर रोजी रात्री ८.२५ वाजता वयाच्या ९५ व्या वर्षी पुणे येथे निधन झाले. ते कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जात. त्यांनी हमाल पंचायत या संघटनेची स्थापना करून आयुष्यभर असंघटित कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!डॉ. बाबा आढाव यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा खोलवर प्रभाव होता. त्यातूनच जातीय भेदभावाला विरोध म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर एक गाव एक पाणवठा ही चळवळ चालवली.
बाबा आढाव यांनी सामाजिक चळवळी आणि कष्टकरी वर्गाचे जीवन दर्शवणारे महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये एक गाव एक पाणवठा, त्यांचे आत्मचरित्रात्मक लेखन मीच तो माणूस आणि एक साधा माणूस, जगरहाटी, रक्ताचं नातं, असंघटित कामगारः काल, आज आणि उद्या, जातपंचायतः दाहक वास्तव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर :
एक चिंतन ही काही महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांनी वाचकांच्या मनावर खोल प्रभाव पाडला. बाबा आढाव यांच्या समाज कार्यात या पुस्तकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
बाबा आढाव यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हमाल पंचायत, एक गाव एक पाणवठा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी दिलेला लढा हा कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राला समाजसेवकांची एक थोर परंपरा कायमच लाभली. त्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले. ते कायम स्मरणात राहतील, त्यांचे विचार येर्णाया पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात फडणवीसांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनीही बाबा आढाव ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, आपल्या महाराष्ट्रात प्रागतिक, कृतीशील विचार मांडून ते आचरणात आणणाऱ्या शिलेदारांची एक मोठी फळी आहे. भूमिका घेताना परिणामांची, प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक, पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉ. बाबा आढाव ह्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल.
त्यांच्या निधनाचं वृत्त समजलं तेव्हा त्यांचा संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सारा पट डोळ्यासमोरून गेला. ‘एकाकी मजदूर’ चळवळ, कामगारांच्या हक्कांसाठीची त्यांची अखंड झुंज, समतेवर आधारित समाजरचनेचा त्यांचा ठाम निर्धार अशा सर्व भूमिकांमधून ते सतत प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत राहिले.
आजच्या सामाजिक दृष्ट्या अस्थिर, विषमतेने, विद्वेषाने ग्रासलेल्या काळात बाबा आढाव ह्यांच्यासारख्या निडर, विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील, असंही शरद पवारांनी नमूद केलं.









