Home वविशमपा निवडणूक २०२६ नालासोपारामध्ये निवडणूक आयोगाविरोधात संताप : ईव्हीएम बॅलेटवरील कमळ, धनुष्यबाण ठळक, तर शिट्टी...

नालासोपारामध्ये निवडणूक आयोगाविरोधात संताप : ईव्हीएम बॅलेटवरील कमळ, धनुष्यबाण ठळक, तर शिट्टी व अन्य चिन्ह पुसट असल्याचा आरोप

168
0
नालासोपारामध्ये निवडणूक आयोगाविरोधात संताप : ईव्हीएम बॅलेटवरील कमळ, धनुष्यबाण ठळक, तर शिट्टी व अन्य चिन्ह पुसट असल्याचा आरोप

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पारदर्शक पद्धतीने होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात निवडणूक आयोगाचा कारभार संशयास्पद असल्याचे आढळून येत आहे. काल ९ जानेवारी रोजी निवडणूक प्रकियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना बोलाविण्यात आले होते त्यावेळी ईव्हीएम मशीनवरील निवडणूक चिन्हांबाबत उपस्थित उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी ईव्हीएम पडताळणीदरम्यान काही राजकीय पक्षांची चिन्हे अस्पष्ट, फिकट आणि पुसट दिसत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे कमळ चिन्ह हे मात्र ठळक दर्शविण्यात आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या प्रतिनिधींनी केला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

येत्या १५ जानेवारीला वसई विरार महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी शुक्रवारी मतदान यंत्र तपासणी करून ती सील बंद करण्याचे काम सुरू होते. यावेळी प्रत्येक भागातील उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना पडताळणीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र नवघर प्रभाग समिती एच मधील प्रभाग क्रमांक २३ मध्ये ईव्हीएम प्रदर्शित करण्यात आल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर असल्याचे राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीनी सांगितले आहे.

ईव्हीएम मशीनवर भारतीय जनता पक्षाचे “कमळ” चिन्ह तुलनेने अधिक गडद व स्पष्ट दिसत असून इतर पक्षांची चिन्हे मात्र स्पष्टतेने दिसत नाहीत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व पक्षांची चिन्हे समान गडदपणा व स्पष्टतेने दिसणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात तसा अनुभव येत नसल्याने मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे बहुजन विकास आघाडीचे संदेश जाधव यांनी सांगितले आहे. आयोगाच्या अधिकृत प्रसिद्धी यादीतील चिन्ह आणि ईव्हीएमवर दाखवण्यात आलेले चिन्ह यामध्ये फरक असून काही ठिकाणी ते उलटे दाखवण्यात आल्याचा आरोप बविआकडून करण्यात आला आहे. ही बाब आम्ही संबंधित निवडणूक अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली आहे.

या सर्व बाबींवर विविध राजकीय पक्षांनी निवडणूक विभागाकडे लेखी निवेदने सादर केली असतानाही ईव्हीएम मशीनआधीच सील करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी बविआ, शिवसेना (उबाठा), मनसे च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, जर या त्रुटींचा परिणाम मतदान प्रक्रियेवर किंवा निवडणूक निकालावर झाला तर न्यायालयात ही दाद मागू असेही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.