होम ताज्या बातम्या वसई-विरारच्या ४०० हून अधिक कंत्राटी कामगारांना कायम करणार; पालकमंत्री गणेश नाईक यांची...

वसई-विरारच्या ४०० हून अधिक कंत्राटी कामगारांना कायम करणार; पालकमंत्री गणेश नाईक यांची ग्वाही

33
0
Image Source : Loksatta.com
Image Source : Loksatta.com

वसई-विरार महानगरपालिकेतील आरोग्य व इतर विभागांत गेल्या १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या ४०० हून अधिक कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘जनता दरबारात’ कामगारांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर, या प्रश्नावर मंत्रालय स्तरावर तातडीने संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन नाईक यांनी दिले.

जनता दरबाराच्या सुरुवातीलाच आरोग्य विभागातील मोठ्या संख्येने कामगारांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन न्यायालयीन आदेशानुसार कायम करण्याची विनंती केली. यावेळी गणेश नाईक म्हणाले की, “जे कामगार आपल्या आयुष्यातील मोलाचा काळ समाजाच्या सेवेसाठी देतात, त्यांना नोकरीत स्थैर्य मिळणे आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत आम्ही असा निर्णय घेतला आहे, त्याच धर्तीवर वसई-विरार आणि जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमधील दीर्घकालीन कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबत आम्ही अनुकूल आहोत.”

यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, वसई-विरार मनपा आयुक्त पृथ्वीराज बी.पी. आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापालिकेने यापूर्वीच यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

प्रदूषण आणि रेल्वे फाटकाचा प्रश्नही मार्गी लागणार बोईसर येथील विराज कंपनीमुळे होणारे प्रदूषण आणि सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे होणारे नुकसान यावरही जनता दरबारात चर्चा झाली. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात कडक भूमिका घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच बोईसर येथील वंजारवाडा रेल्वे फाटक बंद करण्याऐवजी तिथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.