होम डहाणू - पालघर प्रदूषणाचा विळखा नको! बोईसरमध्ये विस्तारित प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

प्रदूषणाचा विळखा नको! बोईसरमध्ये विस्तारित प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

35
0
Image Source : www.Loksatta.com
Image Source : www.Loksatta.com

बोईसर पूर्वेकडील मान-वारांगडे परिसरात वाढत असलेल्या औद्योगिक प्रदूषणाने आता गंभीर वळण घेतले आहे. येथील एका मोठ्या उद्योगसमूहाच्या कारखान्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा आरोप करत, स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाच्या नियमितीकरण आणि विस्तारीकरणाला कडाडून विरोध दर्शवला आहे. शुक्रवारी (८ मे) शेकडो ग्रामस्थांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

सूर्या नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न: आंदोलनकर्त्यांच्या मते, या कारखान्यांमुळे परिसरातील हवा, पाणी आणि जमीन आधीच प्रदूषित झाली आहे. प्रस्तावित विस्तारामुळे सूर्या नदीला मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सूर्या नदी ही केवळ पालघरच नव्हे, तर वसई-विरार महापालिका क्षेत्रासाठी मुख्य जलस्रोत आहे. नदीचे पाणी दूषित झाल्यास लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

राजकीय आणि सामाजिक पाठिंबा: या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचे नेते, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. “निसर्गरम्य मान परिसर आता ओसाड होत चालला आहे, जर हा विस्तार रोखला नाही तर स्थानिकांना विस्थापित व्हावे लागेल,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आंदोलनादरम्यान ‘विराज’ कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि हा विस्तारित प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.