होम डहाणू - पालघर आई रागावल्याचा राग मनात धरून तरुणाची धरणात उडी घेऊन आत्महत्या

आई रागावल्याचा राग मनात धरून तरुणाची धरणात उडी घेऊन आत्महत्या

39
0
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

आईने किरकोळ कारणावरून ओरडल्याचा राग मनात धरून एका २१ वर्षीय तरुणाने धरणात उडी मारून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरवणे धरण परिसरात ही घटना गुरुवारी सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, यज्ञेश प्रमोद सांबरे (वय २१) असे मृताचे नाव असून तो नारोडा येथील रहिवासी होता. बुधवारी रात्री किंवा गुरुवारी सकाळी आई आणि यज्ञेश यांच्यात काही घरगुती कारणावरून वाद झाला होता. यावेळी आईने त्याला थोडे रागावले होते. आईचे बोलणे मनाला लागल्याने यज्ञेश प्रचंड मानसिक तणावाखाली आला आणि रागाच्या भरात घराबाहेर पडला. त्याने थेट मोरवणे धरणाकडे धाव घेतली आणि पाण्यात उडी मारली.

गुरुवारी सकाळी धरणाच्या पाण्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगताना गावकऱ्यांना दिसला. या घटनेची माहिती मिळताच सफाळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दत्ता शेळके यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार मुलाने आई रागावल्यामुळे आत्महत्या केल्याचे समोर येत आहे, मात्र यामागे इतर काही कारण आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नारोडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.